गुंतवणूक आणि आयुर्विम्याची गल्लत
आयुर्विम्याला पर्याय नाही! (पण आयुर्विमा म्हणजे गुंतवणूक नाही)
दीर्घकालीन गुंतवणुकीप्रमाणेच आयुर्विमा हे आपल्या सर्वांच्या आयुष्यातील आर्थिक गणिताचं एक अविभाज्य अंग आहे. खरंतर आयुर्विमा ही गोष्ट इतकी महत्वाची आहे की समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात इथून करायला हवी.
दोनएक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या एका शाळेतील मैत्रिणीचा मेसेज आला. तिच्या घराजवळ राहणाऱ्या मैत्रिणीच्या नवऱ्याचा दुर्दैवाने थोड्याच दिवसांपूर्वी अपघाती मृत्यू झाला होता. घरात ती, तिची वृद्ध सासू, आणि शाळेत जाणाऱ्या दोन मुली आणि कमावतं कोणीच नाही. त्या मुलींच्या शाळेची फी भरण्यासाठी कोणी मदत करू शकेल का असं आवाहन मैत्रिणीने केलं होतं. मदत करताना राहून राहून मनात हा विचार येत होता की भारतात अशी किती कुटुंब असतील जी पुरेशा आयुर्विम्याअभावी अशा आर्थिक संकटात सापडत असतील.
IRDAची आकडेवारी असं दर्शवते की भारतात ५०%हून कमी पात्र लोक आयुर्विमा संरक्षण घेतात. विकसित देशात हेच प्रमाण ९०%च्या वर आहे. तसेच जे भारतीय विमा घेतात त्यांचं सरासरी आयुर्विमा संरक्षण हे अत्यंत तोकडं सुमारे रू ४ लाख आहे. म्हणजे कमावत्या व्यक्तीच्या मृत्युनंतर जर एखाद्या कुटुंबाला ४ लाख मिळाले तर त्यातून त्यांचा वर्षभराचा खर्चही निघणार नाही. २०१४ मधील भारतीयांमधील आयुर्विम्याविषयी केलेलं एक संशोधन असं दर्शवते की आपली विम्याची खरी गरज आणि आपण घेतो ते संरक्षण त्यात तब्बल ९२% तूट आहे - ज्याला रू १ कोटीच्या विमासंरक्षणाची गरज आहे तो फक्त रू ८ लाखाचा विमा घेतो.
आयुर्विम्याविषयीच्या अनास्थेला समाजातील मोठ्या प्रमाणावर असलेली आर्थिक निरक्षरता जबाबदार आहे. पण जे आयुर्विमा घेतात त्यांना पुरेसं संरक्षण न मिळण्यामागे आयुर्विमा कंपन्या आणि त्यांची विकण्याची पारंपारिक पद्धत मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे.
दुर्दैवानं भारतात वर्षानुवर्षं आयुर्विम्याला दीर्घकालीन गुंतवणूकीचा एक पर्याय म्हणून विकण्यात आलं. त्यामुळं आजही असंख्य लोक आयुर्विमा पॉलिसी काढताना ‘मला किती पैसे परत मिळतील’ ह्याची आकडेमोड करत बसतात. मात्र ह्या सगळ्यात ना धड त्यांना चांगला गुंतवणूक परतावा मिळत, ना पुरेसं विमा संरक्षण. समाजात फिरत असलेल्या असंख्य विमा एजंटांच्या गोड बोलण्याला आणि फसव्या आकडेमोडीला ते फशी पडतात आणि चुकीचे पर्याय गळ्यात पाडून घेतात. तेव्हा आयुर्विमा ह्या विषयाचा विचार नक्की कसा केला पाहिजे हे आपण आपल्या डोक्यात पक्क बसवून घेतलं पाहिजे.
सर्वात प्रथम आपण ह्याचा विचार करू की आयुर्विमा म्हणजे काय आणि खरंच आपल्याला त्याची गरज आहे का किंवा नक्की कोणाला त्याची गरज आहे. आयुष्य अनेक अनिश्चित घटनांनी भरलेले आहे. अशा कुठल्याही आकस्मिक, अनिश्चित गोष्टींमुळे होणारे एखाद्याचे आर्थिक नुकसान भरून काढता यावे यासाठी विमा ही संकल्पना अस्तित्वात आली. आपण आपल्या गाडीचा विमा काढतो, मेडिक्लेम (वैद्यकीय विमा) काढतो, किंवा परदेशात जाताना प्रवास विमा काढतो या प्रत्येकात आकस्मिक आर्थिक नुकसानीच्या प्रसंगी भरपाई मिळण्याची सोय असते. त्यासाठी आपल्याला प्रीमियम भरावा लागतो जो विमा संरक्षणाच्या रकमेच्या तुलनेने फार लहान असतो. सर्व प्रकारच्या विम्याला एक नियम लागू होतो – विमा संरक्षण घेतले आणि ते वापरावे लागले नाही तर कधीही चांगले. मात्र गरज पडली आणि ते जवळ नसेल तर सगळ्यात वाईट.
आयुर्विमा ही सुद्धा तशीच संकल्पना आहे. कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्याच्यावरील अवलंबून व्यक्तींचं भवितव्य अधांतरी राहू नये, त्यांच्या भविष्यातील खर्च भागवण्यासाठी निर्वाहनिधी उपलब्ध व्हावा हा आयुर्विम्याचा उद्देश आहे. त्यानुसार आयुर्विमा पॉलिसी ही संरक्षण घेतलेल्या व्यक्तीच्या मृत्युनंतर त्याच्या कुटुंबियांना एक ठराविक रक्कम देऊ करते. इथे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विम्यामुळे जोखीम कमी होत नसते तर फक्त त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान भरून निघू शकते.
ह्याचा आपण थोडासा खोलात जाऊन विचार केला तर आपल्या हे लक्षात येईल की केवळ कमावत्या व्यक्तींनाच आयुर्विम्याची खरी गरज आहे. अर्थातच गृहिणी, सेवानिवृत्त व्यक्ती किंवा लहान मुले ह्यांच्या नावे आयुर्विमा पॉलिसी काढण्याची काहीच गरज नाही. ह्या सर्वांच्या नावे आर्थिक गुंतवणुकी असाव्यात, तसेच त्यांना कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या आयुर्विमा पॉलिसीमधे लाभार्थी ठेवावे, पण त्यांना विमासंरक्षणाची गरज नाही.
दुसरा प्रश्न म्हणजे किती रकमेचं विमा संरक्षण पुरेसं समजावं? ह्या प्रश्नाचं उत्तर अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. ज्याचा विमा काढायचाय त्या व्यक्तीचं वय, वार्षिक उत्पन्न, कोण कोण तिच्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहेत, कामाचं स्वरूप, तिची मालमत्ता आणि न फेडलेली कर्ज ह्या त्यातल्या प्रमुख गोष्टी. मागील लेखात दिल्याप्रमाणे तुम्ही जर तुमच्या कुटुंबासाठी दीर्घकालीन उद्दिष्ट ठरवली असतील तर तुमच्या अनुपस्थितीत ती साध्य करण्यासाठी किती रक्कम लागेल ह्याचा अंदाज बांधला तरी चालु शकेल.
एक ढोबळ अंदाज बांधायचा तर पत्नी आणि २ मुलांची जबाबदारी असणाऱ्या ३५ वर्षीय व्यक्तीला वार्षिक उत्पन्नाच्या किमान १० पट तरी विमा संरक्षण गरजेचं आहे. हेच ४५-५० वयोगटातील व्यक्तीला वार्षिक उत्पन्नाच्या ५-६ पट विमा संरक्षण असले तरी पुरेसे असू शकते. मात्र इथे हे अधोरेखित करावं लागेल की विमासंरक्षणाची गरज ही व्यक्तीसापेक्ष असते. त्यासाठी एकच नियम सर्वांना असं साचेबद्ध उत्तर सांगणे अवघड आहे.
आता रू १२ लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला १० पट म्हणजे रू १.२ कोटीचं विमासंरक्षण गरजेचं असेल तर पारंपारिक मनी-बॅक, एन्डोमेंट किंवा तत्सम पॉलीसीतून ती गरज भागवता येईल का? २५ वर्षासाठी अशी पॉलिसी कोणी घेतलीच तर त्याचे वार्षिक प्रीमियम रू ३-४ लाखाच्या घरात जाईल. म्हणजेच त्या व्यक्तीला आपले २५%-३०% वार्षिक उत्पन्न फक्त विम्याच्या हप्त्यावर खर्च करावं लागेल. अर्थातच हे अशक्य आहे.
त्यामुळे पुरेसं विमासंरक्षण मिळण्यासाठी आयुर्विम्याचादेखील आपण ‘गुंतवणूक नव्हे, केवळ विमा’ अशा पद्धतीने विचार केला पाहिजे. फक्त आणि फक्त विमासंरक्षण देणाऱ्या टर्म प्लानना आपण प्राधान्य दिले पाहिजे - नव्हे अनिवार्य समजले पाहिजे. २५ वर्षांसाठी रू १.२ कोटीचं आयुर्विमा संरक्षण टर्म प्लान घेतल्यास रू २५,००० पेक्षा कमी वार्षिक हप्त्यात मिळू शकतो.
आज आयुर्विम्याचा आपण विम्याच्या अंगाने धांडोळा घेतला. एक गुंतवणूक म्हणून पारंपारिक आयुर्विमा पॉलिसी कशा चुकीच्या ठरतात ते आपण पुढील आठवड्यात बघू.
--- प्राजक्ता कशेळकर